

A farm worker's illness was diagnosed after ten years
विशेष प्रतिनिधी
नांदेड : शेतात दिवसभर राबल्यानंतर एका जेवणात एक भाकरीही खाऊ न शकणाऱ्या तसेच औषधी गोळी गिळायची झाली तर तेही शक्य नसलेल्या एका महिला रुग्णाच्या अन्ननलिकेतील आजाराचे निदान तब्बल एक तपानंतर झाले आहे.
नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांतील गावांतल्या रुग्णांसाठी 'फिरते एन्डोस्कोपी रुग्णालय' हा उपक्रम राबविणाऱ्या डॉ. निवीन जोशी यांच्या गेल्या रविवारच्या मरखेल (ता. देगलूर) येथील शिचिरामध्ये तपासणी आणि उपचारासाठी आलेल्या व शेतावर मजुरीचे काम करणाऱ्या एका मध्यमवयीन महिलेच्या दीर्घकालीन आजाराचे निदान एन्डोस्कोपी आणि आवश्यक त्या चाचण्यांनंतर झाले.
डॉ. नितीन जोशी यांचा वरील उपक्रम दर रविणारी अगोदर निश्चित केलेल्या एका गावामध्ये चालतो. आतापर्यंत नदिड व अन्य पाच जिल्ह्यांतील ५६ गावांमध्ये जाऊन त्यांनी सुमारे दीड हजार रुग्णांची एन्डोस्कोपी आतापर्यंत केली.
ठिकठिकाणी गुंतागुंतीच्या तसेच शरीराच्या पचनसंस्थेत दडलेल्या विकारांचे डॉ. जोशी यांनी निदान केले. गेल्या रविवारी डॉ. जोशी आणि त्यांचे पथक देगलूर तालुक्यातील मरखेल येथे गेले होते.
तेथे आलेल्या रुग्णांची तपासणी सुरू झाल्यानंतर एक मध्यमवयीन शेतमजूर महिला डॉ. जोशींसमोर आली. डॉक्टर, महिला घास गिळता येत नाही, असे तिने सांगितल्यावर पुढील चौकशीत १२ वर्षापासून तिला हा त्रास असल्याचे स्पष्ट झाले. एक भाकरी खायला किती वेळ लागतो, असे डॉक्टरांनी विचारल्यावर ती महिला सहजपणे सांगून गेली, 'डॉक्टर, मी या काळात एकावेळी एक भाकरी खाल्लीच नाही. साधी गोळी गिळायचे म्हटले, तरी तिची पावडर करून ती पाण्यासोबत घ्यावी लागते, असे या महिलेने सांगितले.
डॉक्टरांनी तिचा 'केसपेपर' बघितला, वय ४२, पण वजन फक्त २९ किलो आणि रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण केवळ ६ ग्राम. हे सारेच विसंगत आणि चक्रावणारे होते; पण अनुभवसमृद्ध असलेल्या डॉ. नितीन जोशी यांनी एन्डोस्कोपी करण्याआधीच महिलेच्या आजाराचे निदान केले. 'प्लमर विन्सन सिन्ड्रोम' असा या आजारास वैद्यकीय भाषेत शब्द आहे. अन्ननलिकेच्या सुरुवातीच्या भागात पातळ पापुद्रगासारखा एक पडदा येतो, ज्यामुळे अन्न गिळता येत नाही आणि पुरेसे अनपटक न मिळाल्यामुळे एचबीचे प्रमाण कमी होते, असे डॉ. जोशी यांनी तेथेच सांगितले.
गेली १२ वर्षे या महिलेच्या आजाराचं खरं निदान झालंच नाही. एक कारण म्हणजे डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला मिळाला नाही; पण एन्डोस्कोपीच्या निमित्ताने झालेल्या तपासणी आणि चाचणीतून या गरीब बाईच्या आजाराचे निदान झाले, तरी संपूर्ण उपचारासाठी किमान २५ हजारांचा खर्च येणार आहे. अन्ननलिकेत तयार झालेला पडदा उपचाराद्वारे दूर केला गेला तर या महिलेस व्यवस्थित खाता येईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.