नांदेड : बिलोली तालुक्यात जोरदार पाऊस; वीज पडून बैलाचा मृत्यू

नांदेड : बिलोली तालुक्यात जोरदार पाऊस; वीज पडून बैलाचा मृत्यू

शंकरनगर; पुढारी वृत्तसेवा : बिलोली तालुक्यात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह गुरूवारी (दि. ६) दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यादरम्यान तालुक्यातील रामतीर्थ येथील तिरुपती व्यंकटराव पाटील-देगलूरे यांच्या शेतात बैलावर वीज पडल्याने त्यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला.

तालुक्यातील शंकरनगर व परिसरातील शेतकरी शेताच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी परिश्रम घेत असताना मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतीची कामे आधुनिक यंत्राच्या साह्याने केली जात असली तरी, अल्पभूधारक असलेल्या कित्येक शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आजही पारंपारिक पद्धतीने नांगरटी, वखरटी व पेरणी करण्यासाठी बैल जोडीचाच आधार घ्यावा लागतो. पेरणीचे दिवस तोंडावर आले असल्याने प्रत्येक शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. रामतीर्थ तालुका बिलोली येथील शेतकरी तिरुपती व्यंकटराव पाटील हे आज आपल्या शेतात पेरणीपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी बैलजोडी घेऊन शेतावर गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसामुळे पाटील यांनी आपली बैलजोडी शेतातील गोंदणीच्या झाडाखाली बांधून ते शेतात बांधावर थांबले होते. दरम्यान बैलजोडीवर वीज कोसळल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पाटील यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती देताच रामतीर्थ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल फोले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news