12th Exam : कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाचा प्रयाेग; परीक्षा केंद्रावर ‘ड्रोन’ने घिरट्या; चित्रीकरण करणारा नांदेड पहिला जिल्हा | पुढारी

12th Exam : कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाचा प्रयाेग; परीक्षा केंद्रावर ‘ड्रोन’ने घिरट्या; चित्रीकरण करणारा नांदेड पहिला जिल्हा

नांदेड ; पुढारी वृत्‍तसेवा बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने खास नियोजन केले आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली असून परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे. असा प्रयोग करणारे नांदेड हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार्‍या 12वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात या परीक्षा पार पडाव्यात यासाठी प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी नकारात्मक विचार करतात, परीक्षेची भीती, मानसिक दडपणाखाली असतात. त्यामुळे समुपदेशकांद्वारे विद्यार्थ्यांना नैराशातून बाहेर काढण्यासाठी समूपदेशन केले जात आहे.

परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासनाने यंदा अफलातून फंडा अवलंबिला आहे. संवेदनशील केंद्रांवर थेट ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जात आहे. हे ड्रोन परीक्षा केंद्र इमारत परिसरात मागे-पुढे तसेच इमारतीवर देखील धिरट्या मारुन चित्रीकरण करत आहे. शिवाय विद्यार्थी आल्यानंतर त्यांची तपासणी करतानाचेदेखील चित्रीकरण केले जात आहे. यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होतील, असा विश्वास प्रशासनाला आहे.

कॉपी पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांचे नातेवाईक, मित्र गर्दी करतात. असे 28 केंद्र मागच्या वर्षी निदर्शनास आले होते, यंदा या केंद्रावर प्रशासनाची करडी नजर तर आहेच शिवाय या ठिकाणी ड्रोनने देखील चित्रीकरण केले जात आहे. यामुळे येथे कॉपी पुरवणारे भितीने आले नाहीत, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगीतले.

श्रीकर परदेशी हे फेब्रुवारी 2009 ते मे 2012 या काळात नांदेडचे जिल्हाधिकारी होते. या दरम्यान त्यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले होते. भरारी पथक, परीक्षा केंद्रावर बैठे पथक यासह वेगवेगळे प्रयोग राबविले होते. या प्रयोगानंतर जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पडत होत्या. कॉपीमुक्त परीक्षा आणि पटपडताळणी त्यांच्या या दोन प्रयोगांची राज्य शासनाने दखल घेऊन थेट राज्यात हा प्रयोग ‘नांदेड पॅटर्न’ म्हणून राबविला होता. आजतागायत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात 101 केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. एकूण 42 हजार 89 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला तब्बल 971 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर दुसर्‍या दिवशीच्या गणिताच्या पेपरलादेखील अशीच परिस्थिती दिसून आली.

बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात आणि चोख पोलिस बंदोबस्तात घेतली जात आहे. संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जात आहे, त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी मदत होईल.
– प्रशांत दिग्रसकर
शिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग – 1 च्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पाच विशेष भरारी पथके नियुक्त केली आहेत. तसेच मंडळ कार्यालयाकडून सहा भरारी पथके कार्यान्वित असून यामध्ये प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व विशेष महिला पथकाचा समावेश आहे. यासह एकूण 51 भरारी पथके कार्यान्वित आहेत.

हेही वाचा : 

Back to top button