Sand mafia attack | विळेगाव येथे अवैध वाळू माफियांची मुजोरी; कारवाईस गेलेल्या पोलिसांवर दगड-काठ्यांनी हल्ला!

दोन पोलिस कर्मचारी व दोन होमगार्ड जखमी;दोघांना किरकोळ मार, विळेगावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
Sand Mafia Attack
Sand Mafia Attack प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

नायगाव : अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या डी वाय एस पी यांच्या सोबतच्या पोलिस पथकावरच वाळू उत्खनन करणाऱ्यां वाळू माफियानी दगड, काठ्या व इतर साहित्याने हल्ला केला. ही गंभीर घटना नायगाव तालुक्याच्या सीमेवरील विळेगाव तालुका उमरी येथे गुरुवारी सायंकाळी सात च्या दरम्यान घडली.

या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी आणि दोन होमगार्ड जखमी झाले असून, घटनेनंतर विळेगाव येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांची मजल गेल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक बिलोली श्याम पानेगावकर साहेब व त्यांचे पथकातील पोलिस कर्मचारी गेले असता संबंधित इसमांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या हातातील दगड, काठ्या तसेच इतर साहित्याचा वापर करून हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात पोलिस अंमलदार पुंडलिक दत्ता (वय ५०) ,अनिल रिंदकवाले वय ३६, आणि होमगार्ड शेख अजमत शेख अहमद (वय ३८),गजानन कोत्तापल्ले वय ३३,यांना दुखापत झाली.कोत्तापल्ले यांना डोळ्यावर मार असल्याने गंभीर आजार असल्याचे डॉ लोंढ यांनी सांगितले.

घटनेची गंभीर दखल घेत नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करावेत तसेच त्यांच्या दुखापतीबाबतचा वैद्यकीय अभिप्राय तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

पोलिसांवरच हल्ला; अवैध धंद्यांना कोणाचे अभय?

अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना कारवाई करणाऱ्या पोलिस पथकावरच हल्ला होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. वाळू उत्खनन करणाऱ्यांची वाढलेली मुजोरी आणि कायद्याची भीती उरली नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे.

विळेगावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

घटनेनंतर विळेगाव परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news