

56 cases filed in one day, 79 people in jail; Goods worth Rs. 9.5 lakh seized
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध दारू, जुगार व मटका यांसारख्या बेकायदेशीर व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) संपूर्ण जिल्ह्यात विशेष 'मास रेड' मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी धाडी टाकून ५६ गुन्हे दाखल केले असून ७९ आरोपींवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ८ लाख ७७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांच्या थेट आदेशानुसार ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी आपापल्या हद्दीतील संशयित ठिकाणांवर अचानक छापे टाकले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दारूबंदी कायद्यान्वये ४५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४७आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६ लाख २३ हजार ३७० रुपयांची अवैध दारू व साहित्य जप्त करण्यात आले. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ११ गुन्हे दाखल करून ३२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख ५३ हजार ८७० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
संयुक्त पथकाची धडक मोहीम
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक (नांदेड व भोकर) आणि सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम अशीच नियमितपणे सुरू राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.