

किनवट, पुढारी वृत्तसेवा : भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या किनवट शाखेच्या एटीएममधील 17 लाख 39 हजार पाचशे रुपयांची रोकड गायब करणारा मास्टरमाइंड बँकेचाच शिपाई असल्याचे शुक्रवारी (दि.9) पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी शिपायाच्या घरातून तब्बल 10 लाख 99 हजार रूपये हस्तगत केले आहेत.
व्यापाऱ्यांची विश्वसनीय बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या भाग्यलक्ष्मी महिला सह.बँकेच्या किनवट शाखा कार्यालयाजवळील एटीएममधून 17 लाख 39 हजार पाचशे रूपयांची रोकड गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी (दि.6) सायंकाळी उघडकीस आला होता.
तत्पूर्वीचा घटनाक्रम असा की, बँकेजवळच असलेल्या एटीएम मध्ये शनिवारी (दि.३) सायंकाळी बँकेचे व्यवस्थापक, रोखपाल व संबंधित कर्मचाऱ्यांनी एटीएम मशिनमध्ये 40 लाखांची रोकड भरणा केली होती. रोकड भरत अगर काढत असताना शाखा व्यवस्थापक व रोखपाल यांचा वेगवेगळा पासवर्ड असतो. त्यानुसारच उपरोक्त रक्कम भरण्यात आली होती. रक्कम भरणा केल्यानंतर नेहमीप्रमाणे ग्राहक रक्कम काढत होते. रविवारी सायंकाळी एटीएममधील अखेरची स्लीप बँकेला प्राप्त झाली. तत्पूर्वी अज्ञातांनी कॅमेरालाईन कापून एटीएम मशीनची तोडफोड न करता तब्बल 17 लाख 39 हजार 500 रुपयांची रोकड गायब केली.
प्राथमिक चौकशीनंतर एटीएमचा पहारेकरी, सेवक व अन्य दोघांना बँक सेवेतून निलंबित केल्याचे सांगण्यात आले. रक्कम गायब झाल्याची बाब मंगळवारी रात्री उघड झाल्यानंतर बँक प्रशासनाकडून तातडीने पोलिसांना अवगत करण्यात आले. गुरुवारी (दि.8) अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, किनवटचे डीवायएसपी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली. शाखा व्यवस्थापक संजयकुमार इटकरे यांच्या तक्रारीवरुन गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी संशयित म्हणून बँक अधिकारी भारत सोनटक्के, जयंत कुलकर्णी, नारायण आडे, रोखपाल नामदेव गवळे, सुभाष टाक, शिपाई गीतेश बिमनेनीवार, माधव कल्याणकर व एटीएम गार्ड दिनेश मलकुवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक व मुख्य कार्यालयाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, दोन्ही अधिकाऱ्यांनी तसे काही घडलेच नाही, अशी सारवासारव करीत होते.
त्यानंतर, स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांपैकी एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी मदत करणारा भाग्यलक्ष्मी बँकेचाच शिपाई गीतेश बिमनेनीवार याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एटीएममधून तब्बल 17 लक्ष 39 हजार पाचशे रुपयांची रोकड पासवर्ड माहीत असल्याचा फायदा घेत गायब केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा गीतेश याच्या राहत्या घरातून 10 लाख 99 हजारांची रोकड हस्तगत केली. एटीएममधून रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपी गीतेशने आदिलाबाद येथून 4 लक्ष 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी 3 ते 4 आरोपी असू शकतात, अशी माहिती या प्रकरणाचे तपास करणारे अधिकारी फौजदार सागर झाडे यांनी दिली.