

Who will be Latur's sixth mayor?
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर महापालिकेच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसने भाजपला पुन्हा सत्तेपासून दूर ढकलत वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने ४७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. लातूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आल्याचे आता निश्चित झाले असून लक्ष लागले आहे ते महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे. महापालिकेच्या तेरा वर्षांच्या इतिहासात पाच महापौर झाले आहेत. यामध्ये दोन महापौर खुल्या प्रवर्गातून यामध्ये एक महिला आहे. तर ओबीसीचे तीन पुरुष महापौर बनले आहेत. यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गाला महापौर पदाचे आरक्षण सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लातूर शहर महानगरपालिकेची स्थापना २५ ऑक्टोबर २०११ रोजी झाली. त्यानंतर २०१२ च्या एप्रिलमध्ये पहिली पंचवार्षिक निवडणूक होऊन काँग्रेस ४९ जागा जिंकून बहुमताने सत्तेत आली. त्यावेळी महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटले आणि प्रा. स्मिता खानापुरे महापौर बनल्या. लातूरच्या पहिल्या महापौर बनण्याचा मान स्मिता खानापुरे यांच्या नावावर आहे. त्यांचा कालावधी २१ मे २०१२ ते २२ नोव्हेंबर २०१४ असा होता. अडीच वर्षाच्या दुसऱ्या टर्ममध्ये काँग्रेसचे अख्तर मिस्त्री हे ओबीसी पुरुष प्रवर्गातून २२ नोव्हेंबर २०१४ रोजी महापौर बनले. मात्र दीड वर्षातच त्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्र न्यायालयातून रद्दबातल ठरल्याने महापौरपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी काँग्रेसच्चे अॅड. दीपक सूळ यांची वर्णी लागली. त्यांचा कालावध अवघ्या एक वर्षाचा होता.
त्यांचा कालावधी १३ मे २०१६ ते २१ मे २०१७असा होता. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक निवडणूक माच्च २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत २०१२ मध्ये झिर असलेली भाजपा आणि हिरो ठरली आणि ३६ जाग जिंकून महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेस सत्तेबाहेर आणि भाजपा सत्तेत आली. महापौर पदाच्चे आरक्षण खुल्या प्रवर्गाला सुटले आणि भाजपाचे पहिले महापौर म्हणून सुरेश पवार यांनी २१ मे २०१७ रोजी शपथ घेतली.
अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले आणि लातू महापालिकेत त्यापूर्वी एक महिन्यातच काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे दोन नगरसेवक फोडून महापालिकेत काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केली व २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महापौर म्हणून शपथ घेतली २१ मे २०२२ पर्यंत विक्रांत गोजमगुंडे महापौर होते तेव्हापासून ते आजतागायत महापालिकेत आयुक्त प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १६ जानेवारीला मतमोजणी झाली व काँग्रेसने वंचितला सोबत घेऊन बहुमत खेचून आणले.