

बालाजी फड
लातूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकल्या जातील, असे वक्तव्य केल्याने राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत लातूर विलासरावांचेच असल्याचा विश्वास लातूरकरांनी दाखवला आहे.
आ. अमित देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून 70 पैकी तब्बल 47 जागांवर विजय मिळवून महापालिकेवर एकहाती सत्ता आणली आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.
भाजप-राष्ट्रवादीचा धुव्वा; देशमुखांची जादू कायम
निवडणुकीपूर्वी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आमदार अमित देशमुख यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या या रणनीतीसमोर भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रभाव फिका पडला. भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली होती, तरीही त्यांना 22 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत.
बालेकिल्ला काँग्रेसकडेच सुरक्षित
लातूर महापालिकेच्या इतिहासात 1952 पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2019 हा अडीच वर्षांचा अपवाद वगळता लातूरकरांनी नेहमीच काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. या निकालाने लातूर हा आजही काँग्रेसचाच अभेद्य बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
निकाल थोडक्यात
लातूर महानगरपालिकेत 47 जागांसह काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. स्पष्ट बहुमतामुळे आता महापालिकेत काँग्रेसचाच महापौर विराजमान होईल. तर भाजपला 22 जागांसह प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाला विक्रांत गोजमगुंडे यांच्या रूपाने एका जागेवर विजय मिळाला.
लातूरच्या जनतेचा विकासाला कौल : माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूरकरांनी काँग्रेस पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून लातूर महापालिकेत आज काँग्रेस पक्षाला स्पष्ट पूर्ण बहुमत दिले आहे. सर्वधर्म समभाव विचार असणारे सुसंस्कृत शहर म्हणून राज्यात या शहराची ओळख आहे. लोकनेते विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी या जिल्ह्याची विकासाची विचारांची परंपरा जपलेली आहे. यापुढेही कायम आम्ही सगळेजण मिळून विकासाच्या योजना राबवून लातूर शहर एक विकासाचे मॉडेल म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून निश्चितपणे होईल. आमच्यावर जो विश्वास ठेवून लातूरकरांनी काँग्रेस पक्षाला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व लातूरकरांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.
दोन माजी महापौरांसह दिग्गजांचा पराभव
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन माजी महापौरांसह माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसच्या माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे व सुरेश पवार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. दीपा गिते यांचा समावेश आहे. तसेच माजी सभापती ॲड. शैलेश गोजमगुंडे, माजी नगरसेवक शैलेश स्वामी, प्रवीण अंबुलगेकर, भाजपचे पदाधिकारी ॲड. गणेश गोमचाळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजासाब मणियार, ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पत्नी कल्पना पाटील, गतवेळी बहुमत असतानाही भाजपला सत्ता गमावण्याचे कारण बनलेले व काँग्रेसकडून उपमहापौर झालेले चंद्रकांत बिराजदार यांच्या पत्नी महादेवी बिराजदार या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.
विकासापेक्षा भावनेला प्राधान्य : आ. निलंगेकर
महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने विकासाचा मुद्दा मांडला. याउलट काँग्रेसकडून भावनिक विषयाभोवती निवडणूक फिरवण्यात आली. जनतेचा बुद्धिभेद करत ही निवडणूक झाली. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून यापुढेही सर्व उमेदवार जनसेवेसाठी तत्पर असतील, अशी प्रतिक्रिया निवडणूक प्रमुख माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली. विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नव्हता. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यताही नव्हती.
जेंव्हा विजयाची शक्यता नसते तेंव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे तंत्र काँग्रेसने वापरले. जनतेचा बुद्धिभेद केला आणि भावनिक विषयाभोवती निवडणूक फिरवली. प्रचारातही केवळ भावनिक विषय त्यांनी मांडले, असे आ. निलंगेकर म्हणाले. मनपाच्या सभागृहात भाजपाचे 22 नगरसेवक असणार आहेत. हे 22 प्रतिनिधी जनहितासाठी,सर्वसामान्य लातूरकरांसाठी काम करतील. जनसेवा आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहतील, असेही ते म्हणाले.