

घनसावंगी ः तालुक्यात अलीकडेच वाढलेल्या कडाक्याच्या थंडीचा गहू पिकाला मोठा लाभ होत असून, पिकात जोमदार वाढ दिसून येत आहे. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यातील थंडी गहू पिकासाठी वरदान मानली जाते. यंदा तापमानात झालेली लक्षणीय घसरण गहू पिकाच्या वाढीस प्रक्रियेस अनुकूल ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दहापंधरा दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ वाढलेल्या थंडीत गहू पिकातील पाने गडद हिरवी, तजेलदार दिसत आहेत. दिवसभराचे तापमान मध्यम राहणे आणि रात्रीचे तापमान नीचांकी पातळीवर जाणे ही पिकासाठी अतिशय आदर्श स्थिती असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. तालुक्यातील शेतकरी यंदाच्या हंगामाबद्दल आशावादी आहेत.
काही शेतकऱ्यांनी सांगितले की,“यंदा थंडी वेळेवर व योग्य प्रमाणात आली आहे. पिकाची वाढ उत्तम आहे. पानांना तजेला आला असून रोगराईही फारशी नाही. जर हवामान असंच राहिलं तर यंदा गव्हाचे उत्पादन मागील वर्षापेक्षा अधिक येईल,“ असे मत अनेकांनी व्यक्त केले.
दरम्यान, हवामानातील अनिश्चिततेचा विचार करता शेतकऱ्यांना सिंचनाचे वेळापत्रक काळजीपूर्वक पाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकावर दवाचा परिणाम कमी करण्यासाठी सकाळच्या सिंचनापेक्षा दुपारी किंवा संध्याकाळी हलके सिंचन करावे, तसेच पानावरील रोगांवर नियमित पाहणी ठेवून आवश्यकतेनुसार संरक्षणात्मक फवारणी करावी, असे मार्गदर्शन प्रादेशिक कृषी तज्ज्ञांनी दिले.
थंडीचे वातावरण आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गहू पिकात येणाऱ्या दिवसांत वाढीचा वेग कायम राहील, आणि अखेरपर्यंत हवामानाने साथ दिल्यास तालुक्यातील गहू उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.