

We will achieve development through government schemes: Shivendrasinghraje Bhosale
लातूर, पुढारी वृतसेवा जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री भोसले बोलते होते. त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार बांधव, विद्यार्थी, पालक व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणाला गती देण्यात आली आहे. लातूर शहराच्या २९० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. तसेच जिल्ह्यात जलसंधारण आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ८८२ किलोमीटर लांबीचे ६७८ रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. लवकरच या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अवघ्या तीन महिन्यात १४३ रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात ४७सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यामधून २३० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे जवळपास ८८ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, आदिशक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
पर्यावरण संवर्धन मोहिमेत तसेच 'आपलं लातूर हरीत लातूर' यात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ध्वजारोहणानंतर पोलिस उपनिरीक्षक रामदास मिसाळ यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.