

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा तालुक्यात परवा (दि.१४) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तावरजा व तेरणा नद्या तसेच विविध नाल्यांना पूर आला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.
रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात सरासरी ५४.२० मि.मी. पाऊस झाला. यामध्ये औसा (७४.३० मि.मी.), किनीथोर (८८.५० मि.मी.) व लामजना (७१.०० मि.मी.) महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. औसा तालुक्यातील तावरजा हे धरण ७३ टक्के भरले आहे तर तेरणा नदीवरील माकणी घरण १०० टक्के भरले असून तालुक्यातील इतर माध्यम व लघुप्रकल्प या पावसामुळे ७० टक्क्यापेक्षा जास्त भरली आहेत. भुसनी येथील तावरजा नदीवरील बॅरेजचे पाणी शेतात घुसल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. याच कारणावरून खंडू देवकते (रा. भुसनी) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
अपघातग्रस्त ठिकाणी लातूरचे आमदार अमित देशमुख व औसा येथील नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला. आलमला औसा मार्गावरील पुलावर पाणी आल्याने रात्रभर वाहतूक बंद होती. आलमला बुधोड़ा मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेला. आलमला - मांजरा कारखाना मार्गावरील नवा पूल देखील वाहून गेल्याने आलमला गावाचा संपर्क सकाळी ११ वाजेपर्यंत तुटला होता. जवळगा पो मातोळा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवावा लागला.
या अतिवृष्टीमुळे अनेक गावातील शेतात पाणी थांबले आहे तर अनेक ठिकाणी सुपीक जमीन खरडून गेल्याने उभ्यास पिकाचे आणि जमीनचा गाळाचा भाग वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तालुक्यातील तावरजा धरण ७३ टक्के भरले असून येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज असल्याने येवा नदीपत्रात सोडला जाऊ शकतो तसेच तेरणा धरण १०० टक्के भरल्याने या नदी काठच्या गावांना सतर्क तेच इशारा प्रशासनाकडून दिला आहे.