

Water in Manjara Dam is reserved for drinking only
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील - मांजरा धरणाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला असून, राज्य शासनाच्या आदेशानुसार धरणातील सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
'एल निनों'च्या संभाव्य प्रभावाच्या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने निर्गमित केले आहेत. या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.
शहर तसेच, धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर नियमानुसार तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्या-साठी 'अमृत २.०' योजनेंतर्गत मांजरा धरण परिसरात नवीन जॅकवेल उभारण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. या पाहणी दौऱ्यावेळी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील आणि लातूर शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.