

Water condition in Rena Dam is alarming
विठ्ठल कटके
रेणापुर : रेणा मध्यम प्रकल्पाच्या साठवण क्षेत्रात २६ जुलैला दमदार पाऊस पडल्याने धरणातील पाण्याची पातळी पाच टक्क्याने वाढली. सध्या धरणात २७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. २६ जुलैनंतर मोठा पाऊस झाला नाही, पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी होत आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे रेणा धरणातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक झालेली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
एक महिन्याच्या कालावधीनंतर रेणा धरण क्षेत्रात २६ जुलैला दमदार पाऊस पडल्याने या एकाच दिवसात तालुक्यातील ५ महसूल मंडळांत २९४ मि.मी. पावसाची नोंद झाली. खरिपाच्या पेरणीनंतर तब्बल एक महिना पावसाने ओढ दिल्यामुळे कोवळ्या पिकांवर दुष्काळाचे सावट पसरले होते. पावसाने उघाड दिल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर १७, २२, २६ व २७ जुलैला सलग चार दिवस पाऊस झाला.
या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात पाच टक्क्यांनी पाण्याची पातळी वाढली. तर रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खर ोळा व जवळगा या चारही बॅरेजेसमध्ये पाणी आले. पावसाळा सुरू होऊन दोन तीन महिने झाले परंतु रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. सध्या धरणात २७. २२ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. रेणा मध्याम प्रकल्प मोठ्या पावासाची प्रतीक्षा करीत आहे. रेणा प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणात पाणी कमी आणि गाळ जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.
धरणात गाळ साचल्यामुळे पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे तालुक्यातील नळयोजनांना पाणी कमी पडते. धरण क्षेत्रात जलसाठा व्हावा म्हणून २०२३ - २४ मध्ये शेतकऱ्यांनी स्वखचनि ४ लाख ३० हजार ५०० घनमीटर, २०२४ २५ या वर्षात ४ लाख ७हजार ९९६ घनमीटर असा एकूण ८ लाख ३८ हजार ४९६ घनमीटर गाळाचा उपसा केला आहे. या गाळ काढण्यामुळे धरणात ४४ कोटी लिटर अतिरिक्त जलसाठा झालेला आहे. २ हजार ७६ एकरांवर शेतकऱ्यांनी गाळ टाकला असून या गाळ टाकण्याने खडकाळ व पाणी साठवून ठेवणारी जमिन सुपीक झाली आहे त्यामुळे धान्याच्या उत्पादनातही वाढ होत आहे.
तालुक्यात खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने तब्बल एक महिना ओढ दिली होती त्यामुळे कोवळी पिके कोमेजून जात होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर पिकांना आवश्यक असणारा पाऊस झाला या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. सध्या सोयाबीनसह इतर सर्वच पिकांची अवस्था समाधानकारक असून शेतकरी पिकांतील आंतरमशागतीच्या कामात मग्न आहेत. खुरपणी, कोळपणीच्या कामांबरोबरच सोयाबीनवर विविध कीटकनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. औषधीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे.