

लातूर : आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन इतरांच्या खात्यावर जमा केल्याचे आढळल्याने लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी जिल्हा परिषदेच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. वरिष्ठ सहायक लेखा अधिकारी पवनकुमार वाघमारे, शाखा साहायक सी.एम. थेटे, निरंजन पाटील व एम.बी.राऊत अशी त्यांची नावे आहेत. एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे. दरम्यान या प्रकरणी नियुक्त चौकशी समितीने चौकशी सुरू केली असून सर्वांगाने या प्रकरणाचा तापास होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की वाढवणा प्राथमिक आरोग्य केद्रांतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार झाले होते तथापि एका कर्मचाऱ्याचा पगार झाला. नव्हता त्याने याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागात याबाबत अर्ज केला त्यानंतर तपासणी करण्यात आली असता संबधीत कर्मचाऱ्याचे वेतन त्याच्या नावावर अदा झाल्याचे दिसून आले. अधिक तपासणी केली असता अंकाउंट नंबर बदलल्याचे आढळले. अशी हेराफेर आणखी झाली आहे का? हे पडताळले असता अन्य दोन कर्मचाऱ्यांचा पगार त्रयस्ताच्या नावावर वळवल्याचे दिसून आले. त्यानंतर वरिष्ठ सहायक लेखा अधिकारी पवनकुमार वाघमारे यास याबाबत विचारले असता. त्याने ही हेराफेर केल्याचे कबुल करीत १२ लाख २० हजार ८७० रुपये शासनाच्या खात्यात भरले.
हेराफेरीचे हे प्रकरण गांर्भीर्याने घेत सीईओ राहुलकुमार मीना यांनी वाघमारे यांच्यासह अन्य तिघांना निलंबीत केले. विशेष म्हणजे पवनकुमार वाघमारे याची काही वर्षापूर्वी अनुंकपा तत्वावर आरोग्य विभागात नियुक्ती झाली होती वाढवणा, बिटरगाव व हलगरा येथील कर्मचाऱ्यांचे पगार वळवण्यात आल्याने तेथील वैद्यकीयअधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रकरणाचे धागेदोरे कळण्याची शक्यता आहे.