

Nilanga BJP Group Leader Virbhadra Swami
निलंगा : निलंगा नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. पालिकेच्या गटनेतेपदी नगरसेवक वीरभद्र स्वामी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चार नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकला आहे.
निलंगा नगरपालिका गटनेते पदाची धुरा वीरभद्र स्वामी यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निलंगा नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने निर्भेळ यश संपादन केले होते. एकूण १५ नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष अशा १६ सदस्यांच्या बलाबलानुसार भाजपाने पालिकेची सत्ता काबीज केली आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांनी ३० डिसेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून, आता प्रशासकीय आणि राजकीय कामकाजाला गती देण्यासाठी गटनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि गटनेते निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष आगामी ९ जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेवर लागले आहे. या दिवशी नगरपालिकेतील विविध विषय समित्यांचे सभापती आणि स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
भाजपाच्या या घवघवीत यशानंतर शहराच्या विकासासाठी आता नवीन फळी सज्ज झाली असून, वीरभद्र स्वामी यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. पालिकेतील सत्ताधारी पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि विकासकामांचा अजेंडा राबवण्यासाठी स्वामी यांची ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.