

Vel Amavasya celebrated with enthusiasm in Latur and Dharashiv.
लातूर, पुढारी वृतसेवा: कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली वेळा अमावास्या अर्थात येळवस लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१९) उत्साहात साजरी करण्यात आली. कारभाऱ्यांनी सपत्नीक लक्ष्मीचे पूजन करून सर्वांच्या कुशल मंगलाची तिच्याकडे प्रार्थना केली. 'ओलगे ओलगे सालम पोलगे'च्या घोषाने शिवारे दुमदुमली होती.
आठवडाभरापासून या सणाचे वेद शेतकऱ्यांना लागले होते बाहेरगावी गेलेली माणसे नातेवाईक या सणासाठी गावी परतली होती विशेष म्हणजे शुक्रवारीही गावाच्या दिशने अनेक वाहने मार्गस्थ झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद दाटला होता.
शिवार हिरवाईने नटले होते. भल्या सकाळी शेतावर जाऊन बळीराजाने काळ्या मातीतून दोन लक्ष्मी साकारल्या. तत्पूर्वी त्यांच्या स्थापनेसाठी ज्वारीच्या कडब्याची खोप बनवली. रानात सडा शिंपून लक्ष्मीस्थापनेसाठी मातीच्या चिखलातून सिंहासन साकारले. त्याला पानाफुलांनी सजवले व त्यात लक्ष्म्यांची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर त्याची सपत्नीक पूजा करून सर्वांच्या कुशलमंगलाची अन् धनधान्य संपन्नतेची तिच्याकडे प्रार्थना केली.
ग्रामदेवता व पांडवांसह शिवारातील देवदेवतांची पूजा करून मानाचा नैवेद्य दाखवला गेला. त्यानंतर पंगती रंगल्या. सर्वांनी भजी, रणझणीत आंबील व अन्य पदार्थावर मनसोक्त ताव मारला. त्यांनतर झोके खेळले. क्रिकेट मॅचेस रंगल्या, कुणी पतंग उडवले. अंताक्षरी रंगली, बोरे, ढहाळे तसेच अन्य रानमोव्याचा आस्वाद घेतला. सायंकाळी काळ्या रानात एका मडक्यात दूध तापवले गेले. थंडी जावी म्हणून रात्रीच्या वेळी तिळाच्या पेंढ्या (हेंडगे) पेटवून त्या हातात घेऊन शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरून फेरी मारली. लातूर शहरातील ज्या नागरिकांना गावाकडे जाणे शक्य झाले नाही, त्यांनी शहरातील विविध उद्यानात वनभोजनाचा आनंद घेतला.
बाभळगावच्या शेतात देशमुखांची येळवस
दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बाभळगावी लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी बाभळगाव येथील शेतामध्ये शुक्रवारी दर्शवेळा अमावास्येनिमित्त पूजा केली. स्नेही, मित्र परिवारासोबत निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजनाचा आस्वाद घेतला.