

When will Renapur taluka get a mobile veterinary ambulance?
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत जिल्ह्यात लातूर, औसा व देवणी तालुक्यात आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या "मोबाईल पशुवैद्यकिय रुग्णवाहिका "कार्यान्वयीत झाल्या आहेत. त्यामुळे आजारी व जखमी जनावरांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे. परंतु रेणापूर तालुक्यात अशी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील आजारी व जखमी जनावरांवर वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. आशा जनावरांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रेणापूर तालुक्याला आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेली मोबाईल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी पशुपालकांमधून केली जात आहे.
मानवाप्रमाणेच पृथ्वीतलावरील सर्व प्राण्यांनांहि निसर्गाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. या भुतदयेच्या तत्वाला प्रणाम म्हणुन अनेक प्राणीमित्र प्राण्यांवर निर्पेक्षपणे प्रेम करीत असतात. पुर्वी विविध आजारांने ग्रासलेल्या किंवा जखमी झालेल्या प्राण्यांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. अशा जनावरांना पशुवैद्यकिय दवाखान्यात वेळेवर घेऊन जाने शक्य नव्हते. त्यामुळे अनेक जनावरे उपचाराअभावी मृत्युमुखी पडत होती. यावर उपाय म्हणून आता आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या " मोबाईल पशुवैद्यकिय रुग्णवाहिका "शासनाने कांही तालुक्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
या रुग्णवाहिकांना एक विशिष्ट क्रमांक (१९६२) देण्यात आला आहे. या क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधल्यानंतर कांही वेळेतच हि रुग्णवाहिका शेतकऱ्यांच्या गावात ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यापाड्यात वेळेवर पोहोचत असल्याने आजारी व जखमी जनावरांवर वेळेवर प्राथमिक उपचार मिळत आहेत. परिणामी जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या रुग्णवाहिकेत प्रशिक्षित पशुवैद्यक व सहाय्यक कर्मचारी, जखमांवर उपचारासाठी औषधी व साधन सामुग्री, सलाईन सुविधा, कॅल्शिअम व ऊर्जा पुरक इंजेक्शन्स, जनावरांच्या प्रसुतीसाठी पुर्ण ओटी किट व दुधातील सब क्लिनिक मस्टायटीस तपासणी किट आदी सुविधा उपलब्ध असल्यामुळे या रुग्णवाहिकेची सेवा ग्रामीण भागातील पशुपालकांना फारच उपयुक्त ठरत आहे.
रेणापूर तालुक्यात २० व्या पशुगनणेनुसार ११ हजार ९३८ बैल, १ हजार ४३० रेडे, २९८ नर मेंढया, २ हजार ७८२ शेळ्या, १ हजार ४१६ मादी मेंढ्या, ११ हजार ९०० गायी, २१ हजार ९३१ म्हशी, २०५ इतर प्राणी असे एकुण ४७हजार १९९ पशुधन आहे. या पशुधनावर उपचार करण्यासाठी तालुक्यात उपलब्द असलेली पशुवैद्यकिय यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे आजारी व जखमी जनावरांवर वेळेवर उपचार होत नाहीत. मोबाईल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका उपलब्ध झाली तर जनावरांवर वेळेत उपचार करता येतील.