

उदगीर : अवघ्या ८ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला चिप्सचे आमिष दाखवून घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा अविनाश बिरादार (वय २१, रा. बेलसकरगा, ता. उदगीर) याला उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालय तथा विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीला विविध कलमांन्वये शिक्षा सुनावत गंभीर पोक्सो गुन्ह्यासाठी २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिला चिप्सचे आमिष दाखवून घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.या प्रकरणात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष पोक्सो खटला अंतर्गत उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश एल. पी. पाच्छे यांनी ३ सप्टेंबर रोजी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ अंतर्गत एक वर्ष, कलम ७५ अंतर्गत एक वर्ष आणि कलम ३५१ अंतर्गत दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
पोक्सो कायद्यातील इतर कलमांन्वये तीन वर्षे, पाच वर्षे आणि एक वर्ष सक्तमजुरी तसेच विविध दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमान्वयेही एक वर्ष सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपास अधिकारी मनीष कल्याणकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर विभाग यांनी केला.
न्यायालयीन खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. बी. जाधव यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. पैरवी अंमलदार पोलिस अमलदार ए. एस. शेख यांनी न्यायालयीन पाठपुराव्यासाठीविशेष परिश्रम घेतले. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप गाडे यांनीही प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला.