

प्रतिनिधी – जावेद शेख, उदगीर
शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीत झालेली विलंब आणि टाळाटाळ हे अत्यंत संतापजनक आणि दुर्लक्षाचे उदाहरण ठरत आहे. उदगीर शहर पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांच्याकडे याबाबत लिखित तक्रार दाखल केली असून, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहिती देण्यात आली आहे.
लातूर पोलिसांकडून बलात्काराचा एक गुन्हा दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री उदगीर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पीडित महिला मध्यरात्री सुमारे १२:५० वाजता उदगीर येथे पोहोचली, आणि गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी उदगीरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवले.
मात्र, त्या ठिकाणी ड्युटीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टर उपलब्ध असल्याचे सांगत तपासणी टाळली. पीडित महिला पहाटे ४:३० वाजेपर्यंत रुग्णालयात ताटकळत राहिली. त्यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता पुन्हा पोलिसांनी तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले, पण तेथेही दुपारी १२:३० वाजेपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
या प्रकरणात विशेष म्हणजे, तेथील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने, “मी फक्त १८ वर्षांखालील पिडीतांचीच तपासणी करते”, असे सांगून तपासणीस नकार दिला. ही बाब केवळ खोटीच नव्हे तर वैद्यकीय शपथेच्या आणि सरकारी जबाबदारीच्या पूर्ण विरोधात आहे.
या टाळाटाळीमुळे केवळ पीडितेची मानसिक आणि शारीरिक छळ झाला नाही, तर बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील महत्त्वाचे वैद्यकीय पुरावे नष्ट होण्याचा किंवा आरोपीस लाभ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, डॉ. अजय महिंद्रकर, डॉ. मेघा शाम कुलकर्णी, आणि डॉ. स्वाती सोनवणे या वर्ग १ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांनी दिली.
गंभीर प्रकरणाची न्यायालयाला माहिती देणार “वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे तपासणीस झालेल्या विलंबामुळे पुरावा नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल.”
दिलीप गाडे, पोलीस निरीक्षक, उदगीर शहर पोलीस स्टेशन