

चाकूर : संग्राम वाघमारे
यंदा छत्रपती संभाजी राजे गणेश मंडळाने गणेश विसर्जन सोहळ्याला गणरायाची बैल गाडीवरून मिरवणूक काढीत एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला. यातून त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती जतन आणि त्याचे जिवंत दर्शन घडविले आहे.
छत्रपती संभाजी राजे गणेश मंडळाने पारंपरिक पद्धतीने गणरायाची मिरवणूक बैलगाडीतून काढली. या उपक्रमामुळे प्राचीन भारतीय संस्कृतीला उजाळा मिळाला आहे. यावेळी पारंपरिक वाद्य, ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
छत्रपती संभाजी राजे गणेश मंडळाचे हे ९ वे वर्षे असून प्रत्येक वर्षी या गणेश मंडळाकडून विविध सामाजिक, लोकाउपयोगी व पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वछता मोहीम या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांचा सखा, साथीदार बैलजोडी उपलब्ध करून त्यांनी बैलगाडीवर गणरायाला विराजमान करून त्यांना निरोप देण्यासाठी पारंपरिक बैलगाडी वरून थाटात मिरवणूक काढली. याचा वेगळा अविस्मरणीय सोहळा गणेशभक्त आणि नागरिकांना पहायला मिळाला. या नवीन कल्पनेचा चाकूरकरांनी वेगळा आनंद अनुभवला. यावेळी सर्व गणेशभक्ताच्या चेहऱ्यावर उत्साह होता.
बैल गाडीवरील गणरायाचे बोलके चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती संभाजी राजे गणेश मंडळाने राबविलेल्या या उपक्रमातून धार्मिक आणि पारंपारिक वारसा जपल्याने सर्वत्र स्वागत होत आहे.या मिरवणूकीत शहरातील व्यापारी, नागरिक, महिला आणि मंडळाचे पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
डॉल्बी बंदमुळे पारंपरिक वाद्याला आले महत्व
यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी बंदच्या निर्णयाचे स्वागत होत असून डॉल्बी बंदमुळे पारंपरिक वाद्याला महत्व आले आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीत गोंधळी, आराधी, टाळ, मृदूंग, संभळ, ढोल, ताशे, वीणा, हलगी आणि पर्यावरण पूरक साहित्याचा वापर अधिक झाला आहे. ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक देखावे सादरीकरण करून पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.