

जावेद शेख
उदगीर : दिवसा आकाशात काळे काळे ढग, दिवसभर जोराचे कुंभारी वारे...राञी चमकणार्या विजा पण पाऊस काही बरसतच नाही. शेतकरी पावसाची वाट पाहात ढगाकडे पाहात आहेत ..." अशी परिस्थिती सध्या उदगीर तालुक्यात निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडे खिळल्या आहेत.
जुलै महिना अर्ध्यावर येत असतानाही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील खरीप हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. मृग नक्षत्रात झालेल्या अल्पशा पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. कुठे हिरवेगार शेत दिसत आहे, तर कुठे काळीभोर जमीन अजूनही पावसाची वाट पाहत आहे.
यंदाच्या हंगामात शेतकरी मोठ्या आशेने शिवारात उतरला. पाऊस नियमित होईल, या अपेक्षेने सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांची पेरणी सुरू झाली. परंतु पावसाने साथ न दिल्याने पेरणीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. अनेक ठिकाणी उगवलेली पिके ओलाव्याअभावी करपण्याची भीती निर्माण झाली असून, बर्याच भागात दुबार पेरणीचे संकट गडद होत आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उदगीर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण ६२,९१६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २७,६८०.१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ही एकूण क्षेत्राच्या ४३.९९५ टक्के इतकी आहे. अद्याप ३५,२१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी शिल्लक आहे. खरीप हंगामाच्या या टप्प्यावर अवघ्या ४४ टक्क्यांपर्यंतच पेरणी होणे ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
तालुक्यातील बर्याच भागात अजूनही पेरणी झालेली नसल्याचे चित्र आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, पाऊस लांबल्यास खरीप हंगामाचे संपूर्ण गणित बिघडण्याची शक्यता आहे. तालुक्यातील नदी, नाले, ओढे, तलाव आणि विहिरी अजूनही कोरडेठाक आहेत. अनेक गावांत शेतीसाठी गावातून पाणी नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भूजल पातळीही खालावू लागल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे. बियाणे, खते आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात अजून निश्चित भविष्य नाही. कृषी सेवा केंद्रांवरील व्यवहारही मंदावले असून, सर्वांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत. एकूण खरीप क्षेत्र ६२,९१६ हेक्टर क्षेञांपैकी २७, ६८०.१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी ४३. ९९५% टक्के आसून आर्ध्या क्षेञापेक्षा ही कमी आहे अजूनही ३५,२१६ हेक्टरवर पेरणी झालेली नाही.
कोरडे नदी-नाले
तालुक्यातील बहुतांश नदी, नाले, ओढे, तलाव व विहिरी कोरड्या आहेत. अनेक भागांत शेतावर जाताना गावातून पाणी नेण्याची वेळ आली आहे.
उदगीर तालुक्यात आतापर्यंत सुमारे ४५ ते ५० टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. केवळ पावसाच्या पहिल्या सरींवर घाईघाईने पेरणी केल्यास पुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा अंदाज, जमिनीतील पुरेसा ओलावा आणि पेरणीयोग्य पाऊस यांचा विचार करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा. घाईपेक्षा योग्य वेळ साधणे अधिक महत्त्वाचे आहे.
संदीप वळकुंडे तालुका कृषी अधिकारी, उदगीर
ढग येतात... आशा दाखवतात... पण बरसत नाहीत; उदगीरच्या शेतकऱ्यांचा खरीप अजूनही आभाळाच्या भरोशावर आहे. लवकर पाऊस झाला नाही तर शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट गडद होणार आहे. बी-बियाणे ,खते यावर मोठा खर्च करुन घरी आणला पण पाऊस नसल्याने मोठ्या संकटाची भीती वाटत आहे.
मधुकर मदनुरे, शेतकरी लोणी