

सातारा : खरीप हंगामाच्या तोंडावर सातारा जिल्ह्यात शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ६६३ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी केवळ ४ हजार ९२१ हेक्टरवर म्हणजे अवघ्या १.१९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. उर्वरित ४ लाख ७ हजार ७४२ हेक्टर शेती क्षेत्र पेरणीविना ओस पडले असून त्याचे प्रमाण ९८.८१ टक्के इतके आहे. पेरणी वेळेवर न झाल्याने धान्य उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्याचा पेरणी अहवाल कृषी विभागाने १९ जूनला प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यातील पाटण आणि महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये एकही हेक्टर पेरणी झालेली नाही. सातारा तालुक्यात ५२ हजार ४४६ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असताना केवळ ३० हेक्टरवर पेरणी झाली असून त्याची टक्केवारी ०.०६ इतकी आहे. कोरगाव तालुक्यातही परिस्थिती अत्यंत बिकट असून ३८ हजार ८६९ हेक्टरपैकी अवघ्या ५ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तुलनेने फलटणमध्ये ४.५ हेक्टर, कराडमध्ये २.८१ टक्के आणि माण तालुक्यात २.११ टक्के इतकी पेरणी झाली असली तरी ती सरासरीपेक्षा कमी आहे. पिकनिहाय आकडेवारीनुसार भात १.०५४ हेक्टर, मका १ हजार २७३ हेक्टर, बाजरी ३४७ हेक्टर व सोयाबीनची १०२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
गेल्यावर्षी १९ जूनला जिल्ह्यात तब्बल १३ हजार १५५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरणीचे प्रमाण ६२ टक्क्यांनी घटले आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगामावर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. शेतकरी अद्याप पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मंगळवारी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील काही तालुक्यांत पावसाने सुरूवात केली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पुरेसा पाऊस नसल्याने शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत.
पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरीप हंगाम उशिरा सुरू होऊन उशिराच संपणार आहे. आवश्यक पाऊस न झाल्यास त्याचा थेट परिणाम अन्नधान्य उत्पन्नावर होणार आहे. तसेच खरीप हंगाम उशिरा संपल्याने रब्बी हंगामही उशिरा सुरू होणार आहे. त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. परिणामी अन्नधान्य उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.