

8 bulls rescued from Eicher tempo
उदगीर : उदगीर - लातूर मार्गावर उदगीर जवळच एका आयशर टेम्पो मधून गोवंश जातीचे ८ बैल क्रुर व निर्दयीपणे वागणूक देवून त्यांची वाहतूक करून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना आढळले. याप्रकरणी शनिवारी (३ मे) सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास लातूर मार्गावर नळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर उदगीर जवळ आरोपी संगणमत करून विना पास परवाना स्वतःच्या अर्थिक फायदयासाठी आयशर टेंपो क्र. एम.एच.४३ ए डी ४३२६ या टेम्पो मध्ये तांबड्या, पांढऱ्या व गवळी रंगाचे एकूण ८ बैल घेऊन जात होते. यांची किंमत अंदाजे ४ लाख रुपये आहे.
टेंपोमध्ये कमी जागा असतानासुध्दा ती ८ गोवंशीय जातीची बैल जनावरे डांबून त्यांना इजा व यातना होईल अशा रितीने क्रूरतेची वागणूक देऊन बेकायदेशीररित्या त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना आढळुन आले. ४ लाखांचे ८ बैल व आयशर टेम्पो किमत अंदाजे ५ लाख रुपये असे एकुण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी देविदास ज्ञानोबा किवंडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सुनिल बाबुराव राठोड, (चालक रा. रेणापूर ता रेणापूर) सोहेल मोहसीन अली सय्यद (रा रेणापुर ता. रेणापुर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल शिरसे हे करीत आहेत.