

Theft at Renapur's Balaji-Dnyaneshwar Temple
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजी ज्ञानेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून देवतांच्या मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने, दानपेटीतील रोकड तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि २४ जून रोजी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणापूर येथील बालाजी ज्ञानेश्वर मंदिरात दि. २३ जून रोजी रात्री ८.३० ते २४ जून रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असलेल्या चानल गेटचे व गाभाऱ्याच्या चानल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी देवतांच्या मूर्तीवरील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच दानपेटीतील रोकड असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला केला.
विशेष म्हणजे, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही चोरट्यांनी अत्यंत चलाखीने सदरची चोरी केली आहे. आपण कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरच काढून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे आरोपींनी चोरीपूर्वी मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी मंदिर उघडल्यानंतर पुजारी लक्ष्मण निवृत्ती कोळी (वय ६०, रा. कातळे गल्ली, रेणापूर) यांच्या निदर्शनास चोरीचा प्रकार आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, बीट जमादार विपीन मामडगे, सरफराज सय्यद, शिवाजी कचवे, चालक गिरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(४) व ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
प्राचीन मूर्तीही चोरल्या
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी वरीष्ट पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. यापुर्वीही काही वर्षापूर्वी येथील श्रीराम मंदीरातील श्रीरामाच्या व इतर देवतांच्या प्राचीन मुर्त्यांची व कांही रकमेची चोरी झाली होती त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. परत रेणापुरात देवदेवतांच्या सोन्या - चांदीच्या दागिण्याची चोरी झाल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.