

शहाजी पवार
लातूर : दरवर्षी तो बरसायचा... अधूनमधून चकवाही मारायचा; पुन्हा मौन सोडून धीरही द्यायचा. आमचे जगणे त्याच्याच कृपेवर. याही वर्षी त्याच्याच भरवशावर चाड्यावरची मूठ सोडली. वाटले, बरसेल... पीक येईल... संसाराचा गाडा सुरळीत चालेल. मात्र आषाढ गेला, श्रावण सरला आणि भाद्रपदही संपत आला, तरी आभाळ कोरडेच आहे. रानावरच्या पिकांचा पाचोळा झाला आहे. पाणी आभाळात नाही, नदी-नाल्यात की विहिरी-बोअरमध्ये नाही... ते आता फक्त आमच्या डोळ्यांत आहे! अशी व्यथा लातूरच्या बळीराजाच्या काळजातून उमटत आहे.
त्याचवेळी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे वंशज शिवेंद्रबाबा आमचे पालकमंत्री आहेत ते आमची वेदना ते जाणतील, आमचा आवाज सरकारदरबारी पोहोचवतील आणि या संकटातून आम्हाला सावरतील,’ असा विश्वास बळीराजाच्या मनात आहे. आता आभाळाकडे लागलेली नजर शासनाच्या मदतीकडेही वळली आहे. लातूर जिल्ह्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर यांसारखी पिके शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या संसाराचा आधार आहेत. मात्र यंदा पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिली.
पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पुढे समाधानकारक पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण निसर्गाने या आशेवरच विरजण टाकले.गेल्या सुमारे ५० दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. शेतातील पिके करपून गेली आहेत. काही ठिकाणी सोयाबीनची हिरवी धाटे आणि शेंगा दिसत असल्या तरी त्यात दाणे भरण्याची शक्यता मावळली आहे.
अन्य पिकांनीही माना टाकल्या आहेत. विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला असून भूजलपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अनेक बंधारे कोरडे पडले असून विविध प्रकल्पांमध्ये मृतसाठा शिल्लक आहे. ऐन पावसाळ्यात अनेक गावांमधून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. उसाची वाढ खुंटली आहे. फळबागांनाही पाण्याची चिंता लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आता केवळ पिकांचे नुकसान नाही, तर संपूर्ण वर्षाचा संसार उध्वस्त होण्याची भीती उभी आहे. या आपत्तीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात लातूर जिल्ह्याला बसला आहे.
बळीराजाला संसाराची चिंता
‘आता साल कसं कडेला निघेल? जित्राबांचं काय होईल? लेकीला उजवायचं कसं आणि पोरांना शिकवायचं कसं?’ या प्रश्नांनी शेतकऱ्यांच्या काळजाच पाणी केले आहे. पिकासाठी घेतलेले कर्ज, घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि जनावरांच्या चाऱ्याची चिंता अशा अनेक संकटांनी बळीराजाला घेरले आहे.
आता नजरा सरकारकडे...
या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने कागदी सोपस्कारात वेळ न घालवता लातूरसह मराठवाड्यातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पंचनामे, पीक नुकसानीचे मूल्यांकन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि आर्थिक मदत याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमचे होरपळणारे अंतकरण सरकारदरबारी पोहोचवतील आणि या संकटातून आम्हाला सावरतील,’ असा विश्वास बळीराजाच्या मनात आहे.