

Soybean harvesting accelerates, labor shortage
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यात व रेणा मध्यम प्रकल्पाच्या परिसरात झालेल्या पावसामुळे २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत रेणा प्रकल्पातून जवळपास सोळा वेळेला रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे शेतात साचलेले पाणी शेताच्या बाहेर न पडल्यामुळे शेतातील ऊस व सोयाबीनसह इतर सर्वच पिकांमध्ये आजही कांही प्रमाणात पाणी साचलेले आहे. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
काढणीला आलेले सोयाबीनच्या शेंगा उन्हाने तडकून फुटत आहेत. त्यामुळे सोयाबीनची नासाडी होत आहे कांही ठिकाणी ओल्या शेंगांना करे फुटत असल्याने उरले सुरले पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता धुसर होत आहे. सध्या सोयाबीनच्या काढणीला वेग आला असून यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत आहे. सोयाबीन काढणीसाठी एकरी साडेपाच ते सहा हजाराचा शेतकऱ्यांना खर्च येत असून त्यामानाने उत्पादन होत नाही त्यामुळे कांही शेतकऱ्यांना काढणीचा खर्च पदरून करावा लागत आहे ऐन दिवाळीत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात ऑगस्ट महिन्यात सहा वेळा तर सप्टेंबर महिन्यात दहा वेळा पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतातील पिकांना मोठा फटका बसला. आजही तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्याने शेतात जाता येत नाही. दोन तीन दिवसांपासुन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे जर आनखी पाऊस झाला तर परिस्थिती आनखी गंभीर बनण्याची शक्यता असून रब्बीच्या पेरण्याना विलंब होत आहे.
खासदार, राज्याचे मंत्री, आमदार माजी आमदार तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी नदीकाठच्या व इतर बाधीत क्षेत्राची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे सुचित केले होते. त्यानुसार महसुल, कृषी व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर किती व कधी अनुदान जमा होणार या बाबत शेतकऱ्यामध्ये साशंकता निर्माण झाली आहे.