

Soybean crop on 70,000 hectares at risk
औसा, पुढारी वृत्तसेवा : यंदा औसा तालुक्यात पाऊस कमी झाला पण तो पिकासाठी पोषक असा पडल्याने सर्वत्र खरीप पिके जोमात वाढली पण ऐन फुलोरा, फळधारणा काळात पावसाची ओढ; 'बंपर क्रॉप'ची आशा मातीमोल होण्याची भीती वाढ समाधानकारक झाल्याने एक लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन सह खरीप पिके डौलत होते. यामुळे यंदा 'बंपर क्रॉप'ची आशा निर्माण झाली होती. मात्र, ऐन फुलोरा व फळधारणेच्या काळात सोयाबीनच्या पिकाला पावसाची ओढ लागली आहे. पिके दुपारच्या उन्हात माना टाकत असून, एक-दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर जोमदार वाढलेले पीक 'फ्लॉप शो' ठरण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
औसा तालुक्यात सोयाबीनची पेरणी दोन टप्प्यांत झाली आहे. पहिल्या टप्प्यातील सोयाबीनला फुल लागत असून, दुसऱ्या टप्प्यातील पीक सध्या जोमात आहे. दोन्ही टप्प्यांतील पिकांची वाढ सुरुवातीला समाधानकारक झाली होती. त्यामुळे पाऊसकाळ चांगला राहिला असता तर यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने हलक्या रानातील पिकांना पाण्याचा ताण जाणवू लागला आहे.
नदीकाठच्या भारी जमिनीतील पिके आणखी दोन-चार दिवस तग धरतील; मात्र त्यानंतर त्यांनाही पावसाची गरज भासणार आहे. पावसाअभावी रोगराईचे प्रमाणही वाढत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, एकीकडे सोयाबीनची परिस्थिती अवघड होत असतानाच सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने सोयाबीनची वाढ चांगली झाली होती.
पहिल्या टप्प्यातील पीक शेंगा भरण्याच्या, तर दुसऱ्या टप्प्यातील पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसाने ओढ दिल्याने हेच स्वप्न आता धोक्यात आले आहे. ऐन फुलोरा व फळधारणेच्या काळात सोयाबीनला पाण्याची गरज आहे. हलक्या जमिनीतील पिकांना ताण बसला असून दुपारच्या वेळी पाने व माना टाकत आहेत.
एक-दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तरच पिकांना मोठा दिलासा मिळेल. पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकावर रोगराईचे प्रमाण वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिकाला पाण्याची गरज आणि दुसरीकडे रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.