

लातूर :भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण (एसआयआर) आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी लातूर जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 2002 च्या मतदार यादीशी सध्याच्या मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या मतदारांना भविष्यात सुनावणीच्या क्लिष्ट प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम 11 ते 25 मे या कालावधीत राबवली जात आहे. यासाठी सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत मतदान केंद्रांवर उपलब्ध राहतील. तसेच इतर वेळी ते मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील.
मतदारांनी सन 2002 च्या मतदार यादीतील माहितीनुसार 2002 मधील मतदार संघाचे नाव, मतदार यादी भाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक या तीन प्रमुख बाबींची पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांची नावे 2002 च्या यादीत नाहीत, त्यांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे केली जाणार आहे. लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 235- लातूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली.
ज्या भागात मॅपिंगचे काम 70 टक्क्यांहून कमी आहे, त्या ठिकाणच्या बीएलओ आणि स्वच्छता निरीक्षकांना कामकाज तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात सुनावणी आणि पुराव्यांच्या पडताळणीची किचकट प्रक्रिया टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून आपले मतदार ओळखपत्र दाखवून बीएलओ मार्फत ही मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.