Latur Death : रेणापूरमध्ये डीपी दुरुस्तीवेळी ३५ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

परमिट घेतले, तरी वीजप्रवाह सुरू ; महावितरण कार्यालयात नातेवाईकांचा चार तास ठिय्या
Latur Death
ज्ञानेश्वर गोरे pudhari photo
Published on: 
Updated on: 

पाथरी: वीजपुरवठा बंद करण्याचे परमिट घेतल्यानंतरही दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने डीपीवर काम करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२) सकाळी रेणापूर येथे घडली.

ज्ञानेश्वर गोरे (वय ३५, रा. रेणापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाथरी तालुक्यातील रेणापूर परिसरातील बेंडकोळी येथील डीपी जळाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी ज्ञानेश्वर गोरे हे शुक्रवारी सकाळी डीपीवर चढले होते. काम सुरू करण्यापूर्वी महावितरणकडून वीजपुरवठा बंद असल्याचे परमिट घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असतानाच विद्युत प्रवाह सुरू झाल्याने गोरे यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Latur Death
Nanded Crime : 'एनओसी'साठी लाच मागणाऱ्या लिपिकासह खासगी अभियंत्यावर 'एसीबी'ची कारवाई

घटनेनंतर वीजपुरवठा तातडीने बंद करून गोरे यांना डीपीवरून खाली उतरविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. ज्ञानेश्वर गोरे हे महावितरणच्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याच्या हाताखाली झिरो लाइनमन म्हणून काम करीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

रेणापूर सबस्टेशन अंतर्गत पाथरी, पोहेटाकळी तसेच बाबुलतार परिसरात ते विद्युत दुरुस्तीची कामे करीत होते. वीजपुरवठा बंद करण्याचे परमिट घेतल्यानंतरही दुरुस्तीच्या कामा दरम्यान विद्युत प्रवाह कसा सुरू झाला, हा गंभीर प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

परमिटची प्रक्रिया, वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष दुरुस्तीपूर्वी घेण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनेनंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह पाथरी येथील महावितरण कार्यालयात आणला. परमिट घेतल्यानंतरही वीजप्रवाह सुरू झाल्याबाबत उपस्थितांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. या घटनेची सखोल तांत्रिक चौकशी करून दोषींची जबाबदारी निश्चित करावी, तसेच मृताच्या कुटुंबीयांना संबंधित कंत्राटदार आणि महावितरणकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Latur Death
CPWD Engineer Bribe Case: एनओसीसाठी तब्बल ७० लाखांची लाच! सीबीआयच्या सापळ्यात सीपीडब्ल्यूडी अभियंत्यासह पाच जण

मदतीच्‍या आश्वासनानंतरच मृतदेह घेतला ताब्‍यात

मदतीबाबत निर्णय होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने कार्यालय परिसरात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर आर्थिक मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह तेथून हलविला. घटनेची तांत्रिक तपासणी करून अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news