

Rena Factory produced 4 lakh 21 thousand 111 bags of sugar in 87 days
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५ २६ या गळीत हंगामात अवघ्या ८७ दिवसांत ४ लाख २१ हजार १११ पोते साखरेचे उत्पादन झाले आहे. या साखर पोत्याचे पुजन कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकुर देशमुख, व्हा. चेअरमन अॅड. प्रवीण पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या ८७दिवसात यशस्वी गाळप केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून कारखान्यातील कर्मचाऱ्यांना त्रिपक्षीय करारानुसार ठरलेली १० टक्के पगार वाढ लागू करत असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केली.
रेणा सहकारी साखर कारखान्याने १८ नोहेंबर २०२५ ला गळीत हंगामाच्या गाळप गाळप सुरु केले. १२ फेब्रुवारी २०२६ अखेर अवघ्या ८७ दिवसात कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर करुन ४ लाख ७ हजार ७७५ मे. टन ऊसाचे गाळप करुन बी हेवी मोलॅसेस व सिरप इथेनॉलसह सरासरी ११.९३ टक्के साखर उताऱ्यासह ४ लाख २१ हजार १११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
तसेच कारखान्याचा आसवाणी प्रकल्पही त्याच कार्यक्षमतेने सुरु असुन ४९ लाख २४ हजार ५०१ लिटर इथेनॉल उत्पादन केले आहे शिवाय कारखान्याच्या सहविज निर्मिती प्रकल्पातुन ८४ लाख ४८ हजार युनिट वीज निर्मिती करून ती महावितरणकडे एक्सपोर्ट केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकुर देशमुख यांनी दिली.
सदरील कार्यक्रमास लातूर जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष तथा संचालक आबासाहेब पाटील, तुकाराम कोल्हे, तानाजी कांबळे, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, वैशालीताई पंडीतराव माने, तज्ज्ञ संचालक चंद्रचुड चव्हाण, कार्यलक्षी संचालक आण्णासाहेब पाटील, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, सचिन रविशंकर बरमदे शेतकरी, सभासद व अधिकारी उपस्थित होते.