

रेणापूर ( लातूर ) : रेणा मध्यम प्रकल्पात येवा सुरू असल्याने सोमवारी (दि.22) धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत ते मंगळवारीही (दि.23) उघडे ठेवून रेणा नदीपात्रात ६२९. २२ क्युसेक (१७. ८२ क्युसेक) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी १९, २०, २२, २७ व २८ ऑगस्टला धरणाचे सहा दरवाजे २० सें.मी.ने उघडून तब्बल ७० तास रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर परत १, २, ५ व त्यानंतर १५ सप्टेंबरपासून धरणातील पाणी रेणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात सतत साठ ते सत्तर तास पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर परत १ सप्टेंबर २०२५ ला दुसऱ्यांदा धरणाचे दोन दरवाजे १० सेंमी ने उघडण्यात आले होते. परत धरण क्षेत्रात पाऊस पडत राहिला २,५, १५ व १६ सप्टेंबरपासून रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भातखेडा येथे रेणा नदी मांजरा नदीला मिळते. मांजरा नदीतही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रेणा नदीचे पाणी तुंबून ते लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्यांच्या सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही पिके आजही पाण्याखालीच आहेत. परत - परत धरणातील पाणी सोडल्याने उरलेली पिकेही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
२८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत रेणा नदी पात्रात ३७५५. २१ क्युमेक्स म्हणजेच १०६. ३५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यावेळी नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या चार ते पाच हजार फुटांपर्यंतच्या शेतामध्ये पाणी घुसले होते. त्यात शेकडो शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच पिके पाण्याखाली आली आहेत. ओढ्याच्या पाण्यामुळे अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. २०२२ व २ सप्टेंबर २०२४ मध्येही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही धरणातील पाण्याचा रेणा नदीपात्रात विसर्ग करावा लागला होता. २८ ऑगस्टनंतर धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू झाल्यामुळे परत सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रोजी धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघाडण्यात आले आहेत. सध्या रेणा नदीपात्रात ६२९. २२ क्युसेक, १७. ८२ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.