

Amit Shah and Ravindra Chavan meet
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
महायुतीमध्ये उत्तम समन्वय ठेवण्याचा सल्ला
राज्यातील संघटनात्मक बाबींबद्दल अमित शाह यांना दिली माहिती
नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. महायुतीमध्ये उत्तम समन्वय ठेवा आणि मजबूत तयारी करून स्थानिक स्वराज्य संस्था जिंका, असा कानमंत्र अमित शाह यांनी दिल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला टप्पा पूर्ण झाला. लवकरच दुसरा टप्पा होणार आहे, या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते.
दिल्लीत संसदेचे तर नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्ही पातळीवर नेते व्यस्त असताना रवींद्र चव्हाण दिल्लीत दाखल झाले होते. दिल्ली दौऱ्यात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक गोष्टींची किनार असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी राज्यात महायुतीसाठी अत्यंत पोषक वातावरण असताना काही नेते महायुती तुटेल अशी वक्तव्य करतात अशी तक्रार केल्याची चर्चा होती. होत्या त्यानंतर अमित शाह यांनी यांना आश्वासन दिले होते की सर्व काही आलबेल होईल.
या भेटीच्या काही दिवसानंतर शिंदेंचा रोख ज्यांच्याकडे होता ते रवींद्र चव्हाण अमित शाह यांच्या भेटीसाठी आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील संघटनात्मक बाबींबद्दल अमित शाह यांना माहिती दिली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीबद्दलही माहिती दिली. यावर अमित शाह यांनी एकत्र राहून अधिकाधिक चांगली कामगिरी करा, महायुतीमध्ये उत्तम समन्वय ठेवा, सर्व ठिकाणी ताकदीने लढा, असा कानमंत्र दिला. हा कानमंत्र घेऊन रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा नागपूरकडे रवाना झाले.