

Raju Shetty: Divert 'Shaktipeeth' funds for drought relief
लातूर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. गरज नसलेल्या 'शक्तिपीठ' महामार्गासाठी निधी खर्च करण्याऐवजी तो निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. साखर टंचाई कमी करण्यासाठी १५ आक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याच्या सरकारच्या सक्तीला आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले शेजारच्या कर्नाटकने दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफकडे अहवाल पाठविला आहे. महाराष्ट्रात मात्र पाहणी, सर्वेक्षण आणि माहिती घेण्याच्या नावाखाली निर्णय लांबविला जात आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून जगविलेली पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने प्रशासनाच्या अहवालांवर अवलंबून न राहता तातडीने मदत जाहीर करावी. साखरेची टंचाई कमी करण्यासाठी सरकार १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्याची सक्ती करीत आहे.
मात्र, सध्या ऊस अपरिपक्व असल्याने त्याला अपेक्षित वजन मिळणार नाही आणि साखर उताराही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आर्थिक फटका शेतकरी तसेच साखर कारखानदारांना बसणार आहे. आपला या गाळप धोरणाला विरोध असून, हंगाम लवकर सुरू करू नये, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. राज्यभरातील साखर कारखान्यांच्या संचालकांना आपण याबाबत भेटत असून आपण मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचीही भेट घेऊन आपली भूमिका मांडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारला लवकर गाळप करायचे असल्यास प्रतिटन ५०० रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, साखरेचा किमान हमीदर प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा असे ते म्हणाले.
साखर उद्योगातील कथित ४८ लाख टन साखर साठ्याची चौकशी करण्यासाठी टास्कफोर्स स्थापन करावी, तसेच साखर उद्योगाला चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशाही मागण्या त्यांनी केल्या. या मागण्यांसाठी २९ सप्टेंबरला केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवास्थानासमोर महाराष्ट्र-कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासह आपण आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.