

Rainwater on the weekly market in Renapur
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर येथे दर शुक्रवारी भाजीपाल्याचा आठवडे बाजार भरतो २५ जुलैला दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाल्याने काही काळ बाजार विस्कळीत झाला. शहराच्या मुख्य रस्त्यावरील चांदणी चौकात पाणी साचल्याने बाजारकरूंना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक व्यापाऱ्यांनी भाजीपाल्यावर ताडपत्र्या झाकलेल्या होत्या.
शुक्रवारी (दि. २५) रेणा-पूरच्या आठवडी बाजारात सकाळ पासूनच भाजीपाल्याची आवक झाली लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजीपाला, फळे व इतर वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल लावले. मात्र दुपारी एक वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. आजूबाजूच्या परिसरातील आलेल्या बाजारकरूंना पावसामुळे भाजीपाला खरेदी करताना छत्र्यांचा वापर करावा लागत होता, दुपारी १ वाजता अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांची व बाजारकरूंची एकच धांदल उडाली. ज्यांनी ताडपत्री टाकून आसरा केला होता त्यांचे साहित्य सुरक्षित राहिले.
तर ज्यांचा भाजीपाला व फळे उघड्यावर होती ती पावसातच भिजत होती. पावसामुळे लोकांनी जवळच्या दुकानाचा आसरा घेतला होता. आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली होती त्यामुळे भाव कमी झाल्याचे दिसून येत होते. कोथिंबीरचे भाव उतरल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे चित्र पहायला मिळाले. तसेच फळांचेही भाव स्थिर होते. बटाटा, बीट, भेंडी, भोपळा, चवळी, कोबी, गवार, काकडी, कांदा, लसूण, कारली, मेथी, ढोबळी मिरची, वांगे, पालक, शेपू, दादा शेवगा, दोडका या भाजीपाल्यांच्या दरामध्ये कमालीची घसरण झाल्याचे दिसून आले.
रेणापूरच्या आठवडे बाजारात परळी, अंबाज ोगाई, पिंपळदरी, किनगाव या भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. मोठ्या वाहनातून शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. शेतकऱ्यांना बाजारात दिवसभर बसून भाजीपाला विकणे परवडत नसल्याने ते लहान लहान व्यापाऱ्यांना ठोक विक्री करून जात असतात.
अशा लहान-लहान व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजीपाला विकूनच त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. असे व्यापारी सकाळी भाजीपाला खरेदी करून दिवसभर विकत असतात. अचानक आलेल्या पावसामुळे अशा विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले.