

Participation of doctors in the Latur Dahi Handi festival.
लातूर, पुढारी वृत्तसेवा: ढोल-ताशांचा कडकडाट... लेझीमच्या तालावर थिरकणारे डॉक्टर... 'गोविंदा आला रे!'च्या जयघोषात थरावर थर चढविणारे गोविंदा... फुलांची उधळण, पाण्याचे फवारे उधळण आणि दहीहंडी फोडताच उसळलेला जल्लोष ! अशा उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित पहिल्याच दहीहंडी उत्सवाने डॉक्टरांच्या व्यस्त दिनचर्येला आनंदाची किनार दिली. रुग्णसेवेच्या धावपळीत सदैव व्यस्त असणाऱ्या डॉक्टरांनी काही क्षण कामाचा ताण बाजूला ठेवत एकत्र येऊन मनमोकळा संवाद साधला आणि उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
या अनोख्या उपक्रमात व्यवसायाने डॉक्टर असलेले आणि सध्या लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीने डॉक्टरांचा उत्साह आणखी वाढला. यावेळी डॉ. काळगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दहीहंडी स्पर्धेत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील युवा गोविंदा संघाने प्रथम क्रमांक पटकावत अकरा हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
पाच हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या संघाने पटकावले, तर अडीच हजाराचे तृतीय पारितोषिक 'आपलं घर' संस्थेच्या चमूने मिळविले. उत्सवात एकूण पाच दहीहंडी फोडण्यात आल्या. मानवी मनोरे रचताना सहभागींच्या धैर्यासोबतच परस्परांवरील विश्वास, अचूक समन्वय आणि सांघिक भावनेचे दर्शन घडले.
दहीहंडीची उत्साहवर्धक गीते, ढोल-ताशांचा निनाद, लेझीमचा ताल आणि फुलांची उधळण यामुळे वातावरणात चैतन्य संचारले. डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. रुग्णसेवेची जबाबदारी, कामाचा ताण आणि सततची धावपळ ही डॉक्टरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
रुग्णसेवेत दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांसाठी हा केवळ दहीहंडीचा उत्सव न ठरता कामाच्या ताणातून काही क्षण विरंगुळा मिळवत 'आपण सगळे एकत्र आहोत' ही भावना अधिक दृढ करणारा स्नेहसोहळा ठरला. त्यामुळे आयएमएच्या या पहिल्याच दहीहंडी उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक व स्वागत केले.