

रेणापूर : पानगाव येथे ५ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या छत व इमारतीला एक-दीड वर्षातच गळती लागल्याने हे चैत्य स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व्हावे या प्रयत्नाला तडा गेला आहे. याच्या दुरुस्तीसाठी गेल्या सहा वर्षांपासून ट्रस्टीच्या वतीने पत्रव्यवहार केला जात आहे. परंतु, संबंधित ठेकदार प्रशासन व लोकप्रतिनिधीं यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवत असल्याची तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्हि. के. आचार्य यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.
पानगाव यथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी असून ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी अस्थी दर्शन व अभिवादनासाठी हजारो आंबेडकर अनुयायी येथे येत असतात. येथील पवित्र अस्थींचा अमूल्य ठेवा सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याचे जतन व्हावे. या कल्पकतेतून स्मारक उभारण्यात यावे यासाठी आमदार अमित देशमुख यांनी ते पर्यटन मंत्री असताना ५ कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला.
या स्मारकारचे काम सा.बां. मार्फत एका ठेकेदाराकडून करण्यात आले. ते २०२१ मध्ये पूर्ण झाले. बांधकाम होत असतांना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ट्रस्टचे अध्यक्ष व्हि. के. आचार्य यांनी माजीमंत्री अमित देशमुख, बांधकाम विभागाचे विविध अभियंता, जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. तथापि ठेकेदाराने दुर्लक्ष करून पुढे बांधकाम सुरू ठेवले. परिणामी एक दीड वर्षातच स्मारकाच्या छताला व भिंतीला गळती लागली. दुरुस्ती करावी म्हणून आचार्य यांनी संबंधिताना अनेक वेळा पत्रव्यवहार केला.
संबंधितानीही स्मारकाच्या वॉटर प्रुफींग व इतर स्थापत्य कामांच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराला सूचना देण्यात दिल्या. परंतु ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. यावर्षी पावसाचे पाणी झिरपून तळमजल्याच्या हॉलमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. वेळीच गळती बंद नाही केली तर इमारतीस धोका निर्माण होऊ शकतो. अशी माहिती आचार्य यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव वैभव आचार्य, सद्स्य अशोक गायकवाड, राहुल कासारे, आनंद आचार्य आदींची उपस्थिती होती.