

चाकूर : विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा ठपका लावीत नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या विरोधात १४ नगरसेवकांनी मंगळवारी (दि.१३) दुपारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. यामुळे चाकूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर अविश्वास निर्माण झाल्याने त्यांना नगराध्यक्ष पदावरून काढून टाकावे, अशी मागणी या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावात केली आहे. माकणे हे नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होते. ते लातूरला राहत असल्याने ते या पदासाठी वेळ देवू शकत नव्हते. त्यामुळे नगरपंचायतच्या दैनंदिन कामकाजात विस्कळीतपणा येत होता, असेही या अविश्वास ठरावात म्हटले आहे. या अविश्वास ठरावावर नगरसेवक अब्दूलकरीम गुळवे, मिलिंद महालिंगे, भागवत फुले, साईप्रसाद हिप्पाळे, अभिमन्यू धोंडगे, मुज्जमील सय्यद, नगरसेविका सुजाता रेड्डी, ज्योती स्वामी, शबाना सय्यद, शुभांगी सय्यद, गंगुबाई गोलावार, गोदावरी पाटील, वैशाली कांबळे आणि शाहीनबानू सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही.