

चाकूर : चाकूर-उदगीर रस्त्यावरील हणमंतवाडी-बोथी गावाजवळ रविवारी (दि.१५) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. हा खून असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
बोथी गावातील काही तरूण पहाटे व्यायामाला निघाले असता रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. महिलेच्या डोक्यावरचे केस काढण्यात आले आहेत. अंगावर गाऊन असून एका हातावर सूरज व दुसऱ्या हातावर दिपक असे नाव गोंदलेले आहे. तसेच अंगावर मारहाणीच्या खूणा आहेत. खून करून मृतदेह येथे आणून टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. कोणतीही संशयास्पद वस्तु घटनास्थळी आढळली नसल्यामुळे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर असून वैद्यकीय अहवाला नंतर खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. निकम यांनी दिली आहे.