

निलंगा : पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे छापा टाकून 8 लाख 59 हाजार 560 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. संजय काशिनाथ कन्ना (वय 45, रा. उस्तुरी, ता. निलंगा) असे आरेपीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले.
18 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजता पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिस स्टेशन कासार शिरशी हद्दीत तांबाळा पाटी येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईत पांढरी मारुती सुझुकी वॅगनर कार (एमएच 24 सीडी 3593) थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीत कारमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा सापडला.
कार चालक व मालक संजय काशिनाथ कन्ना (वय 45, रा. उस्तुरी, ता. निलंगा) यास ताब्यात घेऊन पंचांसमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा केला गेला. जप्त साठ्यात रत्ना 3000 तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखू, बाबा नवरत्न पानमसाला, आर.आर. पानमसाला, रजनीगंधा यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील डीवायएसपी अक्षय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, पोउपनि उत्तम जाधव, रामहरी भोसले, यशवंत घुगे तसेच पोलीस ठाणे कासार शिरशीचे सपोनि गर्जे, पोलीस अंमलदार तपसे आणि नागमोडे यांनी केली.