

Tagarkheda bandhara repair fund
निलंगा: लातूर तालुक्यातील तगरखेडा येथील बंधाऱ्याला पाण्याची गळती लागल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. बंधाऱ्याच्या गेट्स व इतर यांत्रिक घटकांमध्ये झालेल्या बिघाडामुळे सिंचन साठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने तगरखेडा बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता तब्बल १ कोटी ७९ लाख ६६ हजार ७१५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार दि. ११ सप्टेंबर २०२५तगरखेडा बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता मंजूर झालेल्या निधीचा उपयोग पुढील कामांसाठी केला जाणार आहे: लोखंडी गेट्स (०६) ची विशेष दुरुस्ती, यांत्रिक व विद्युत घटकांची देखभाल व बदल, सुरक्षित जलसाठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या, तांत्रिक मान्यतेनुसार प्रशासकीय मंजुरीतील कामे, या मंजुरीनुसार एकूण कामाचा खर्च १,७९,६६,७१५ इतका असून त्यात यांत्रिक कामे, विद्युत कामे, विमा, जीएसटी व आकस्मिक खर्च यांचा समावेश आहे.
तगरखेडा बंधाऱ्यामुळे औराद-शहाजनी, निलंगा परिसरातील हजारो एकर शेतीला पाणीपुरवठा केला जातो. गळतीमुळे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात सिंचनाच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता शासन मंजुरीमुळे बंधाऱ्याची गळती थांबून पाणी सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना आधार मिळून उत्पादनात वाढ होणार आहे.
तगरखेडा व औराद शहाजनी परिसरातील शेतकरी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. बंधाऱ्याच्या गळतीवर कायमस्वरूपी उपाय होऊन आमच्या शेतीला पाणीपुरवठा होणार आहे, हे आमच्यासाठी मोठे समाधान आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे तगरखेडा बंधाऱ्याचे आयुष्य वाढून पाण्याचा अपव्यय थांबणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती होणार आहे असे जण सामान्यात बोललं जात आहे.