

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात सीबीआय पथकाने लातूर शहरात कारवाईची व्याप्ती वाढवली असून शुक्रवारी (दि. २२) दोन डॉक्टरांच्या रुग्णालयांवर छापेमारी करत सखोल चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय पथकाने सकाळी औसा रोड परिसरातील एका आयुर्वेदीक डॉक्टरांच्या रुग्णालयात छापा टाकला. या ठिकाणी सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर बार्शी रोडवरील दयानंद गेट परिसरात असलेल्या एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या रुग्णालयातही पथकाने तपासणी करत कागदपत्रांची पडताळणी केली.
या कारवाईदरम्यान दोन्ही डॉक्टरांच्या घरांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली की नाही, याबाबतही संध्याकाळपर्यंत स्पष्टता मिळू शकली नाही.
दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांनी नीट परीक्षेचे पेपर खरेदी केल्याचा संशय असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. याशिवाय आणखी चार डॉक्टर सीबीआयच्या रडारवर असून त्यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या लातूरमधील सीबीआय कोठडीत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या चौकशीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासाची पुढील दिशा ठरवली जात असल्याचे समजते.