

Need water for the Rabi crop? Then apply by February 3rd
लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाटबंधारे विभागाने कंबर कसली आहे. लातूर पाटबंधारे विभाग क्र. २ अंतर्गत येणाऱ्या मध्यम व लघु प्रकल्पांतून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांसाठी पाणी हवे आहे, त्यांनी ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
लातूर जिल्ह्यातील घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी याशिवाय ९८ लघु प्रकल्प, साठवण तलाव आणि बॅरेजेसचाही यात समावेश आहे. शेतकऱ्यांनी संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकारी कार्यालयात जाऊन विहित नमुन्यात (नमुना ७ व ७ अ) अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करताना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जमिनीचा चालू सातबारा जोडावा. जुनी पाणीपट्टी थकलेली असल्यास ती भरून पावती जोडणे अनिवार्य आहे, त्यानंतरच अर्ज मंजूर होईल. पाणी मागणी किमान ०.२० आर किंवा त्याच्या पटीत असावी. ज्या उपसा सिंचन धारकांकडे रीतसर परवाना आहे, त्यांना एकपट दराने आकारणी होईल. मात्र, परवाना नसलेल्यांना अनधिकृत उपसा समजून दीडपट दंड भरावा लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी परवाने घेऊनच सिंचन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप यांनी केले आहे.
विनापरवाना पाणी घेतल्यास दीडपट दंड
विनापरवाना पाणी घेतल्यास किंवा मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त सिंचन केल्यास दीडपट दराने दंड आकारला जाईल. तसेच बेकायदेशीरपणे गेट उघडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. उपसा सिंचनधारकांनी ठरवून दिलेल्या पाळीतच पाणी घ्यावे. नियमांचे उल्लंघन केल्यास वीजपुरवठा खंडित करणे किंवा मोटार जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.