

Municipal Corporation Election: 5 static survey teams are operational within the city
लातूर पुढारी वृत्तसेवा: लातूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहिता कक्षामार्फत शहरांतर्गत पाच ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या या पथकामार्फत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ७ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदे शानुसार आचार संहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी आम्रपाली कासोदेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय ड गांधी चौक येथे आचार संहिता कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे.
लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याचा दृष्टीकोनातून आचार संहिता कक्षा अंतर्गत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.
शहरातील प्रवेश करणा-या पाच प्रमुख मार्गावर वासनगाव पाटी औसा रोड, बोरवटी पेट्रोल पंप अंबाजोगाई रोड, रेल्वे उडडाण पूल बार्शी रोड, शेतकी शाळा नांदेड रोड व पोलीस क्वार्टर बाभळगाव रोड येथे ५ स्थिर सर्वेक्षण पथके (३ सत्रामध्ये २४ तास) कार्यान्वीत करण्यात आली आहेत. शहरात दाखल होणा-या वाहनाची कसुन तपासणी करण्यात येत आहे. तसेच लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निहाय ६ भरारी पथके, विमानतळ येथे १ भरारी पथक असे एकूण ७ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सभा व मिरवणुकांचे होणार चित्रीकरण
चित्रीकरण सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातून होणाऱ्या सभा व मिरवणुका व प्रचाराच्या अनुषंगाने प्रत्येक बाबीचे चित्रीकरण या १२ पथकांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच या सर्व चित्रीकरण तपासणीसाठी ८ चित्रीकरण तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.