

Chakur Gharani River Drowning
चाकूर : तालुक्यातील नळेगाव येथील एका बेपत्ता महिलेसह पुरुषाचा नळेगाव ते सावंतवाडी जाणाऱ्या रोडवरील घरणी नदीतील पाण्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.१५) दुपारी तीन वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नळेगाव ते सावंतवाडी मार्गावर घरणी नदीपात्राच्या पाण्यात सोमवारी अनिता लक्ष्मण तेलंगे (वय ३५) आणि राजकुमार हानमंत श्रंगारे (वय 40, दोघेही रा. नळेगाव) यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने नळेगाव परिसरात चर्चेला उधाण आले आहे. अनिता लक्ष्मण तेलंगे ह्या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्या घरातून बेपत्ता होत्या.
चाकूर पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलिसांचा शोध सुरु होता. तर राजकुमार हणमंत श्रृंगारे हे नळेगाव येथे रोजंदारीवर काम करीत होते. तेही तीन दिवसांपासून बेपत्ता असून, त्याबाबतची तक्रार मात्र पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली नव्हती. या दोघांचे मृतदेह घरणी नदीच्या पाण्यात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आहे. नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या दोघांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. अनिता तेलंगे यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि राजकुमार श्रृंगारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
याबाबत लक्ष्मण गोविंद तेलंगे आणि साजन राजकुमार शृंगारे यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निलकंठे, सिद्धेश्वर जाधव, शत्रुघ्न शिंदे, शिरीष नागरगोजे, योगेश मरपल्ले हे करीत आहेत.