

लातूर : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील खरीप हंगाम हातचा गेला आहे. उभ्या पिकांचा पाचोळा झाला आहे. या आपत्तीचा सर्वाधिक फटका लातूर व धाराशिव जिल्ह्याला बसला आहे. गत २५ वर्षांत आपण असे आरिष्ठ प्रथमच पहात व अनुभवत आहोत.
लातूर जिल्ह्यात केवळ दुष्काळसदृश्य परिस्थिती नसून दुष्काळच आहे व याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती केली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री मराठवाड्यातील या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार देणारा निर्णय जाहीर करतील, असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शनिवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आ. निलंगेकर म्हणाले, लातूर जिल्ह्यात तब्बल ४७ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. जलस्रोतांनी तळ गाठला असून भूजल पातळी साडेचार मीटरने खाली गेली आहे. पावसाळ्यातच अनेक गावांवर टँकरने पाणी मागण्याची वेळ आली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनसह अन्य पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. कुठे सोयाबीनची हिरवी धाटे दिसत असली तरी शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत.
शेतकऱ्यांसमोर आता ‘पुढे काय करायचे आणि वर्ष कसे काढायचे?’ हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मराठवाडा या आपत्तीने होरपळा आहे त्याची मोठी हाय लातूर व धाराशीव या जिल्ह्यांना लागली आहे. लातूर जिल्ह्यातील ९५ टक्के बंधारे कोरडे पडले असून, १४५ जलप्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के मृतसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमानात ४० टक्के तफावत आहे. मराठवाड्यात सर्वांत कमी पाऊस लातूर जिल्ह्यात झाला आहे.
रब्बीचीही आशा धुसर झाली आहे त्यामुळे ही केवळ पिकांची हानी नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरचे मोठे संकट आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले. असे असले तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास आ. निलंगेकर यांनी दिला.
धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून, गुरांसाठी चारा छावण्या, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, रब्बीकरीता मोफत बियाणे आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना सरकार करणार असून शेतकऱ्यांनी खचून जावू असे आ. निलंगेकर म्हणाले .
दरम्यान या संकटाचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. शेतकरी आणि नागरिकांना आधार देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. विरोधी पक्षही ते करीत असल्याने त्यांच्या या भूमिकेबद्दल आ. निलंगेकर यांनी समाधान व्यक्त केले. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, दगडू सोळंके, कुमोद लोभे, शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिरादार, मनोज पाटील, दीपक मठपती, गणेशजी गवारे आदी उपस्थित होते.
मराठवाडा वॉटर ग्रिडला नवी दिशा
पाणीटंचाई आणि मराठवाडा हे समीकरण आता बदलण्याची गरज आहे. मराठवाड्याला सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी राज्य शासनाने ‘मराठवाडा वॉटर ग्रिड’चा संकल्प केला आहे. पूर्वी कालव्यांद्वारे पाणीपुरवठ्याची योजना होती; मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याने पाईपद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय सुचविण्यात आला. त्यानुसार नवा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठविण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी योजनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्री मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथे देतील, असेही आ. निलंगेकर यांनी सांगितले.