

लातूर : आमची मुंबईची वाट आता कोणीही रोखू शकणार नाही. आता आरपारच्या लढाईसाठी मुंबई गाठणार असून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. मुंबईत जाण्यापूर्वी सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केली तर गुलालाचा ट्रक घेऊन सरकारचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईला जाऊ, अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, सरकारने तयार राहावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी (दि.१४) दिला. ते लातूर येथे मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
२९ ऑगस्टला मुबंईत नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज (गुरूवारी) मराठा समाजबांधवांशी संवाद साधला. बुधवारीच ते लातूरमध्ये मुक्कामी आले होते. त्यावेळीही समाजबांधवांशी त्यांचा वार्तालाप सुरू होता. गुरुवारी त्यांनी समाजबांधवांची बैठक घेतली.
ते म्हणाले, आरक्षणाअभावी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा समाजातील अनेकांनी आरक्षण नसल्याने नैराश्येतून मरणाला कवटाळले आहे. समाजाची स्थिती अत्यंत हालाखीची असून ती सुधारण्यासाठी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच ही लढाई आहे. आता ही लढाई आरपारची लढाई होणार असून त्यासाठी सर्वांनी मुंबई गाठायची आहे, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. दरम्यान राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर येथे जरांगे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना ते म्हणाले, सरनाईक यांना आपण बोलावले नव्हते. ते स्वइच्छेने आले असून त्यांना मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहीजे यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा आम्हाला राजीनामा हवा असता तर त्यांना निवडूनच दिले नसते. त्यांनी आता गैरसमजातून बाहेर यावे, असेही ते यावेळी म्हणाले.