

शिरूर अनंतपाळ (लातूर) : तालुक्यातील लक्कडजवळगा हे घरणी नदीच्या कुशीत वसलेले गाव, अनेक नामवंत नेत्यांची जन्मभूमी असूनही गेली तब्बल तीस वर्षे गावातील एसटी बस सेवा बंद होती. त्यामुळे गावातील नागरिक, वृद्ध, शाळकरी विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गावातून जवळच्या गावात जायला तीन-तीन किलोमीटर पायपीट करावी लागत होती.
गावात तब्बल १५ जण वेगवेगळ्या पायऱ्यांवर आमदार, जिल्हा परिषद सदस्य, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांसारखी पदे भूषवून गेले. मात्र, कोणालाही ही बस सेवा पुन्हा सुरू करता आली नाही. अखेर गावातीलच तरुण मंगेश लिंबाराज माडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासन व एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर लक्कडजवळगा गावात एसटी बस पुन्हा सुरू झाली. गावात बस येताच गावकऱ्यांनी बसला पुष्पहार अर्पण करून चालक-वाहक यांचे उत्साहात स्वागत केले.
बस आल्याचे ग्रामस्थांना आश्चर्य मंगेश माडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे यावेळी गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले. गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, तीस वर्षांनी बसगाडी गावात दिसली हेच आमच्यासाठी मोठे आश्चर्य आणि आनंद आहे. मंगेश माडे आणि त्यांच्या टीमने आमची सोय केली. आता वृद्ध आणि विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.