Latur Farmer Protest | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महिला रस्त्यावर; वाळलेले सोयाबीन घेऊन तहसील कार्यालयावर धडक

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर; औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत, पीकविमा व उपाययोजनांची मागणी
Ausa Tehsil Office Protest
शेकडो महिलांनी वाळलेले सोयाबीनचे पीक हातात घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. Pudahri
Published on: 
Updated on: 

Ausa Tehsil Office Protest

औसा : पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर बनली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता महिलाही आक्रमक झाल्या आहेत. औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी (दि.७) शेकडो महिलांनी वाळलेले सोयाबीनचे पीक हातात घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मातोळा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या दीपाली भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत सोयाबीनसह अन्य पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत औसा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आवश्यक उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी महिलांनी केली.

Ausa Tehsil Office Protest
Latur News : औसा तालुक्यात दुष्काळाची चाहूल; सोयाबीन करपले

पंचनामे करून सरसकट पीकविमा द्या

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना सरसकट पीकविम्याचा लाभ द्यावा आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. केवळ कागदोपत्री पाहणी न करता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी अपेक्षाही महिलांनी व्यक्त केली.

कोरडवाहूला हेक्टरी लाख, बागायतदारांना दीड लाख

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी मोर्चातील महिलांनी केली.

Ausa Tehsil Office Protest
Latur News : लातूरच्या लेकींची देशभरात दमदार कामगिरी

मातोळा गटासह तालुक्यातील विविध भागांतील महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या. वाळलेल्या सोयाबीनचे पीक हातात घेऊन महिलांनी प्रशासनाचे लक्ष खरीप हंगामातील गंभीर परिस्थितीकडे वेधले.

मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून आर्थिक मदत, पीकविमा आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते, याकडे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news