

Documents Scam Latur Udgir
उदगीर : बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय नोंदीचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुरूवारी (दि.२) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात संस्थाचालक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर परिषद उदगीर येथील नगर रचना सहायक अशीतोष पोपट जाधव यांच्या फिर्यादीवरून बापुराव शंकरराव राठोड (रा. कौळखेड, ता.उदगीर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १६ जून २०१० रोजी उदगीर शहरातील देगलूर रोड परिसरातील महादेव मंदिराजवळ आरोपीने बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून उदगीर नगर परिषदेचे प्रारंभ प्रमाणपत्र व बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र तयार केले.
ही बनावट कागदपत्रे गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ, कौळखेड तर्फे संचालित शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित दस्तऐवजांच्या आधारे आरोपीने कपटपूर्वक शासकीय कागदपत्रांचे बनावटपण करून आर्थिक लाभ मिळवल्याचा फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी करीत आहेत.