

लातूर : लातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्यूशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा येऊ नये व कोणतीही असामाजिक प्रवृत्ती डोके वर काढू नये यासाठी शुक्रवारी (दि.20) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ट्यूशन एरिया परिसरात पोलिसांनी अचानक कोंबिंग ऑपरेशन करीत सात जणांवर कारवाई केली व मोटार वाहन कायद्यांतर्गत 86 खटले दाखल करुन 58 हजार 500 रुपयांचा दंड वसुल केला.
विशेष म्हणजे या मोहिमेत स्वतः पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष उतरून कारवाईवर देखरेख ठेवली. उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या समन्वयाने ही कारवाई पार पडली.
सदर मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधी चौक पोलीस ठाणे, विवेकानंद चौक पोलीस ठाणे, दामिनी पथक व दंगा नियंत्रण पथकातील एकूण 9 पोलीस अधिकारी, 60 पोलीस अंमलदार व होमगार्ड सहभागी झाले होते.ट्युशन एरियातील मुख्य रस्ते, गल्ली-बोळ, चौक व विद्यार्थ्यांची वर्दळ असलेली ठिकाणे यांचे संयुक्त निरीक्षण करण्यात आले. विनाकारण जमाव, संशयास्पद हालचाली, विद्यार्थ्यांना त्रास देणारे व्यक्ती यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
संशयितांची नोंद, ओळख पडताळणी व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये 86 केसेस दाखल करून 58 हाजार ,500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असून 2 फटाका सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे तसेच गैरवर्तन आढळलेल्या 7 जणांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई ट्युशन एरियामध्ये सतत बेताल वर्तन करणाऱ्या व विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर वचक बसविण्यासाठी करण्यात आली आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना भयमुक्त, सुरक्षित आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू असून.पुढील काळातही अशाच प्रकारच्या अचानक व व्यापक मोहिमा राबवून असामाजिक हालचालींवर आळा,गुन्हेगारी प्रवृत्तीचे निर्मूलन,विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.